साईमत लाईव्ह नंदुरबार प्रतिनिधी
एकीकडे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. राज्यातील असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिक मोतोश्रीवर पोहचत आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेत मोठे खिडार पडले होते. मात्र ही पोकळी सोमवारी आमदार आमश्या पाडवी यांनी साडे सात हजार कार्यकर्त्यांचा पाठींबा सादर करून भरून काढली. आता शिवसेना तळागाळात रुजवण्याचे काम करू अशी ग्वाही यावेळी, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिली.
साहेब, आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेसोबतच कायम असू, आम्हाला कुठल्याही पदाचा लोभ नाही, शिवसेना आमचा प्राण आहे. पक्ष अडचणीत सापडला असताना सोडून जाणे, ही पक्षासोबत गद्दारी असून हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गद्दारी करणे शिकवले नसून स्वाभिमानाने ताठ मानाने जगणे शिकविले आहे, अशा शब्दात आमदार आमश्या पाडवी यांनी शेकडो शिवसैनिकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेत ग्वाही दिली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार पाडवी व जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात भेट घेतली. यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही पक्षाशी गद्दारी करणार नाही, अखेरपर्यंत पक्षप्रमुख ठाकरे यांच्यावर नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून शिवसेनेशी एकनिष्ठ राहू अशा आशयाचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील ५ हजार तर शहादा विधानसभा क्षेत्रातील अडीच हजार असे सुमारे साडेसात हजार शपथपत्र शिवसैनिकांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भेट स्वरूपात दिले.