नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात दुसऱ्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सकडून ह्युदाईला तगडं आव्हान मिळू लागलं आहे. मे महिन्यात टाटाने ह्युंदाईचं बाजारातलं दुसरं स्थान हिसकावलं होतं. तेव्हापासून ह्युंदाई कंपनी भारतीय वाहन बाजारात आक्रमकपणे नवीनवीन उत्पादनं लाँच करतेय. गेल्या महिन्यात ह्युंदाईने भारतात त्यांची वेन्यू ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन अवतारात लाँच केली. त्यानंतर कंपनीने त्यांची प्रीमियम एसयूव्ही ह्युंदाई टक्सनवरून (Hyundai Tucson) पडदा हटवला आहे. आता कंपनी आगामी काळात भारतीय वाहन बाजारात अनेक नवीन उत्पादनं लाँच करणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ह्युंदाई मोटर इंडिया कंपनी आगामी काळात प्रीमियम हॅचबॅक कार ह्युंदाई आय ३० (Hyundai i30) भारतात लाँच करू शकते. भारतात प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती बलेनो आणि टाटा अल्ट्रॉजसारख्या कार्स चांगली कामगिरी करत आहेत. कंपनी ह्युंदाई आय ३० मध्ये बोल्ड डिझाईन आणि स्पोर्टी लूक देऊ शकते. कंपनी या कारमध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स देऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आय ३० कारबद्दलची माहिती दिली आहे.
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आय ३० कारचा एक फोटो आहे. त्यानुसार ही प्रीमियम हॅचबॅक कार थोडी लांब असेल. या कारमध्ये लेटेस्ट डिझाईनसह स्पोर्टी फ्रंट लूक दिला जाईल. या कारमध्ये कंपनी स्पोर्टी ग्रिल आणि हेडलॅम्प देईल. तसेच मागच्या बाजूला उत्तम टेललॅम्प्स आणि रुंद टायर्स देईल. आधी म्हटल्याप्रमाणे कंपनी या प्रीमियम कारमध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्स देऊ शकते. जसे की यात वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग, मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसारखे फीचर्स मिळतील.
कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देखील मिळतील. ज्यामध्ये ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम म्हणजेच एडीएएस, शानदार आणि मोठा डॅशबोर्ड, एम्बिएंट लाईटसह अनेक प्रीमियम फीचर्स या कारमध्ये दिले जातील. यात लेदरेट आणि व्हेंटीलेटेड सीट्स देखील दिल्या जातील अशी शक्यता आहे.