शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाचा रस्ता धरला. काही दिवसांपूर्वी ते दिल्ली येथे गेले होते, तेथे त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर ते आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. हा शिवसेनेला आणि जालना जिल्ह्यासाठी धक्का मानला जात आहे.
दिल्लीतही शिंदेना भेटले?
अर्जून खोतकर हे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. खासदारांची बैठक ज्या दिवशी झाली त्याच दिवशी शिंदे यांची खोतकर यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली होती अशी मतदारसंघात चर्चा होती. त्यानंतर आता थेट तेच शिंदे गटात सामिल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्जून खोतकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जात होते. त्यांच्या नैतृत्वातच जालना जिल्ह्यात शिवसेना आणखी प्रबळ झाली. जालन्याचा गड ते सातत्याने राखत आले आहेत. मागील निवडणूकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे अनेक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठवाड्यात शिवसेनेला तडे
मराठवाडा हा शिवसेनेचा अभेद्य गड मानला जातो, पण याच गडाला आता घरघर लागली. औरंगाबादेतील बहुतांश आमदार शिंदे गटात गेले आणि शिवसेनेला दगाफटका सहन करावा लागला. मराठवाड्यात दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी सभा घेत शक्तीप्रदर्शन केले पण त्यानंतर लगेचच खोतकर यांनी शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेचे नुकसान थांबता थांबत नसल्याचे दिसून आले आहे.