मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे आता आरे येथील मेट्रो कारशेडचा मार्ग सुकर झाला आहे. आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, यावर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच ही स्थगिती हटवण्यात आली आहे.
आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडच्या कामांना स्थगिती दिली होती. आरे ऐवजी कांजूर मार्ग येथे कारशेड उभारण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. दरम्यान, मेट्रो ३ चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्याने लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पण दुर्दैवानं या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाला सामना करावा लागत आहे.