कळवणःसाईमत लाईव्ह
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडाच्या मंदिर गाभाऱ्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असल्याने येत्या २१ जुलैपासून दीड महिना भगवती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
देवस्थान ट्रस्टमार्फत सन २०१२-१३ पासून याबाबत नियोजन होत असून, पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन व आयआयटी पवईसह नाशिकच्या मे. अजिंक्यतारा कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून मूर्ती संवर्धन व देखभालीचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने येत्या २१ जुलैपासून ४५ दिवस भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालयाजवळ भगवतीची प्रतिकृती भाविकांसाठी पर्यायी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्त निवास व इतर सुविधा याकाळातही सुरू राहतील. याबाबत सविस्तर माहिती आज, बुधवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत देवस्थान ट्रस्टकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे करंजगावसह परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. करंजगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन जिजामाता गढीलाही गोदावरीच्या पुराच्या पाण्याच्या वेढा पडला आहे. करंजगावचे अतिप्राचीन सिद्धेश्वर मंदिर, खंडेराव महाराज मंदिर, पाणीपुरवठा करणारी विहीर व कब्रस्थान पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. गोदावरी आणि कादवा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावर असलेल्या विटभट्ट्याही पाण्यात गेल्या आहेत.