संजय राऊत यांनी दिला शिंदे सरकारला इशारा; बंडखोरांनी गद्दारी केली, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल…

0
15

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. आता पक्ष संघटना पुन्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह पक्षातील निष्ठावान नेते मैदानात उतरले आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना बळ देण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.शिवसैनिकांनी संबोधित करताना त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

धनुष्यबाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला दिला आहे.

 

बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी संजय राऊत यांनी मुख्यत्वे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली. गुलाबरावांचा जुलाबराव होईल त्यांना देण्यात आलेले ५० खोके पचणार नाहीत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. आमदार फुटल्यामुळे शिवसेना फुटली असे होत नाही. शिवसेनेनं सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्त्व उभं केलं. नगरसेवक, आमदार, खासदार बनवलं याचाच जर यांना विसर पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत.बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणं दिली .मात्र खरे कारण त्यांनी अद्यापही सांगितलेले नाही. निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका हे त्यांच्या बंडखोरीचे खरे कारण असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेशी बंडखोरांनी गद्दारी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेत त्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.

सर्वसामान्य जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. येथे जमलेले लोक ५० खोकी घेऊन नव्हे, तर स्वत:च्या खिशातले ५० रुपये खर्च करून उपस्थित आहेत. हीच खरी शिवसेना असल्याचे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंना ज्यादिवशी वर्षा बंगला सोडावा लागला त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. या अश्रूंमध्ये बंडखोर वाहून जातील. त्यांना शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राऊतांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले. शिवसैनिक हेच शिवसेनेची ताकद आहेत. आमच्यात अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची क्षमता आहे. आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. कारण आमचे हायकमांड दिल्लीत नाही तर मातोश्रीत आहेत.दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून त्यांनी शिवसेनेत फूट पाडली, असा आरोपही राऊत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here