मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (SC) ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे. फडणवीस दिल्लीतील वरीष्ठ नेते अमित शहांसह इतर नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेही दिल्लीच्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे हे आठवड्याभरापासून गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे. मात्र कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आजपासून भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे. खाजगी विमानाने मुंबईहुन दिल्लीला निघाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत दिल्लीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहे.