मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
मनसेकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेत्यांची राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकत मनसेची स्थापना केली होती.उद्धव ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना कंटाळून मी पक्ष सोडल्याचं राज यांनी जाहीर केले होते. त्यानंतर इतक्या वर्षांनी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करण्यात आली आहे. शिंदे यांच्यासह पक्षाचे ३८ आमदार फुटल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता तांत्रिकदृष्ट्या या विलीनीकरण करायचं झाल्यास मनसेमध्ये हा गट समाविष्ट होईल का ? या चर्चाना उधाण आले आहे.