मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आतापर्यंत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना गळाला लावले आहे. तसेच शिवसेनेचे अनेक खासदारांनाही शिंदे यांनी फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.मात्र शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याची माहिती किर्तीकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांनी पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे.
एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
दरम्यान फोडाफोडीचे राजकारण करत बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. मी पाठीत वार करणार नाही मी समोर येऊन निर्णय घेणारा आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत मला एकट करायचं ठरवल आहे आणि त्याला तुम्ही बळी पडत आहेत,. असे उद्धव ठाकरे शिंदेंसह बंडखोर आमदारांना म्हणाले . जे नेते जनतेतून निवडून आले. त्यांना फोडले जात आहे. मात्र निवडून देणाऱ्यांना विकत घेऊ शकत नाही तुम्ही त्यांना फोडू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.