मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाने आपल्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे या गटाचे नामकरण करण्यात आले आहे. बंडखोर आमदारांच्या बैठकीत खूप विचार करून हे नाव ठरवण्यात आल्याची माहिती पुढे आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नाही, यावरही निर्णय झाला आहे.
दरम्यान, पुढील काही तासांमध्ये या सगळ्या राजकीय नाट्यामागे भाजपचा सहभाग आहे की नाही, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कमालीचे सक्रिय झाले असून ते अनेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. या भेटीगाठींबाबत अत्यंत गुप्तता बाळगली जात आहे. मात्र यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ, असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.



