मुंबई :प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे गट त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनला एकनाथ शिंदेंनी नाकारलं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनाही आव्हान दिले. बाळासाहेबांचे लाडके अपत्य म्हणजे शिवसेना होती. आता बंडखोरांना निष्ठा काय असते ती दाखवावी लागेल. यापुढे बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव न वापरता त्यांनी जगून दाखवावे. माझा फोटो न लावता लोकांमध्ये वावरून दाखवा, असे आव्हान त्यांनी बंडखोरांना दिले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागं लागलं आहे. कोरोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरू झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं. आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता. कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वाकांक्षा, एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली. मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्या वेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरीरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं, झाडाची फुलं न्या, फाद्या न्या, मुळं नेऊ शकत नाही. मी बरा होऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते.
उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावलं होतं अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झालं तरी सोडून जाणार नाही असं सांगितलं होतं. पण त्या वेळी उपस्थित असणारे मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय? आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावंसं वाटतं, मग मला वाटणार नाही का? मला या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. आता वीट हाणणार, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. हे सारे भाजपाने केले. त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे; पण षंड नाही. ज्यांची स्वप्नं होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्नं असतील तर त्यांनी जावं. सेनेची मुळं आज माझ्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले.
