मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर आज मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेमधील विश्वासू नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात ज्यांचे मोठे स्थान होते, त्या एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षासोबतच बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार सहभागी झाले आहे. शिवसेनेकडे आता अवघे दहा ते बारा आमदार शिल्लक आहेत. मुळात शिवसेनेचा उदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर पक्षाला प्रचंड जनाधार लाभला. पक्षाने राज्यातील सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली. मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता पक्षावर दावा ठोकत आहेत. आमदारांनी साथ सोडल्यामुळे हातबल झाले आहेत. शेवटचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक कार्डचा देखील वापर केला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहान केले. मात्र त्याचा देखील काही उपयोग झाला नाही
या सर्व परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे हे जर शिवसेनेमध्ये असते तर परिस्थिती हाताबाहेर गेलीच नसती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अनेक शिवसैनिक तसेच ठाकरे कुंटुंबाचे जे अगदी जवळचे आहेत, त्यांच्यातही हीच चर्चा आहे. आज राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये असते तर त्यांच्याशी बंड करण्याची कोणाची हिंमत झाली नसती. ते आपला भाऊ उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे ठामपणे उभे राहिले असते. शिवसेनेमधील हे बंड त्यांनी मोडीत काढले असते. राज ठाकरे यांच्यामागे आजही मोठा जनाधार आहे. जर राज हे शिवसेनेत असते. तर त्यांनी उद्धव यांना या संकटातून नक्कीच बाहेर काढले असते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
