मुंबई : प्रतिनिधी
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. शिंदे यांनी ५० हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केल्याने ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता शिवसेनेच्या चिन्हावरच हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आता पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी धडपड सुरु केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठका बोलावल्या आहेत. आज दिवसभर या बैठका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहावे लागेल.
राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाची महत्वाची बैठक आज दुपारी शिवसेना भवनात होणार आहे. तर मुख्यमंत्री हे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांशी संध्याकाळी संवाद साधणार आहेत.
मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकही शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची माहिती आहे. आमदार यामिनी जाधव या शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या आहेत यामिनी जाधव या माजी नगरसेविका आहेत त्यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. जाधव यांच्याकडून शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांच्या गळाला लावले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत.
मुंबईत शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक हे शिंदे सोबत जाण्यासाठी मागे पुढे पाहू शकतात, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. मात्र आज होणाऱ्या दोन्ही बैठका शिवसेनेसाठी अधिक महत्त्वाच्या असू शकतात.