मालेगाव : प्रतिनिधी
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे देखील काल रात्री गुवाहाटी येथे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात पोचलेत. आता या बंडाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यातली एक चर्चा अशी की बंडानंतर, ठाकरे गटात काय हालचाली सुरू आहेत, याची माहिती घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच भुसे यांना मागे ठेवले होते.
पक्षांतरविरोधी कायदा लागू न होण्याइतके, शिवसेनेचे दोन तृतीयांश (३७) आमदार शिंदे यांच्या गटात आल्यानंतर, काल रात्री भुसे शिंदे यांच्या गटात पोहचले आहेत. त्याआधी तीन दिवस ते सतत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाले. आदित्य ठाकरे सारथ्य करत असलेल्या गाडीतून हॉटेलकडे जातांनाही ते सोबत होते. यानंतर भुसे आणि राठोड यांनी मुख्यमंञ्यांना शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती.
शिंदे- भुसे संबंध
एकनाथ शिंदे आणि भुसे यांचे मैत्रीचे संबंध राजकारणात सर्वांना माहीत आहेत. ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही तर शिंदे तरुणपणाचे मित्र आहेत. या दोघांची दृढ मैत्री धर्मवीर चित्रपटातून सर्वांसमोर आली आहे. विचारे हे भुसे यांचे व्याही व आप्तेष्ट असल्याने शिंदे यांच्या सोबत भुसे बंडखोरांच्या पहिल्या फळीत असतील असा अंदाज होता. पण, तसे झाले नाही. शिंदे यांच्याकडे बंडखोर आमदारांचा पुरेसा आकडा झाल्यानंतर, तीन दिवसांनी भुसे शिंदेंच्या गोटात पोहचले आहेत.
एकूण घटनाक्रम पाहता, शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत काय हालचाली होतात याची माहिती घेऊन त्यानुसार व्यूव्हरचना ठरवण्यासाठी शिंदे यांनीच भुसे यांना शिवसेनेच्या गोटात मागे ठेवले होते. भुसे यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, अशी चर्चा आहे.



