मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारही भाजपासोबत (BJP) सरकार बनवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत चला असा सूर शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या बैठीकीत आवळला असून, त्याबाबतचा निरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विरोधकांना नाकीनऊ आणण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने ईडी यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. एकीकडे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विविध नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या नोटीस येत आहेत. त्यांना सतावण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारकडून होत आहे. याला कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड बंड पुकारले असताना आता शिवसेनेच्या खासदारांचीही हीच भावना आहे.
राज्यात आधी शिवसेना आणि भाजपाती युती होती. मात्र २०१९ मध्ये ती तुटली. मतभेद वाढले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मात्र भाजपाकडून याचा वचपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून काढला जात आहे. सरकार अस्थिर करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांना ईडीच्या नोटीसदेऊन त्यांना त्रास देण्याचे काम सतत सुरू आहे. अनिल परब, नितीन सरदेसाई, भावना गवळी यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीस येवून गेल्या आहेत. या सर्व राजकारणाला कंटाळून शिवसेनेमधून आधीपासूनच मागणी होत होती.
राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार भाजपाला आवडलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी अनेकदा केला आहे. एकनाथ शिंदेंना फोडण्याचे षडयंत्र करतानाच त्याच दिवशी अनिल परब यांना नोटीस येते, या धावपळीत ते आमच्याबरोबर असून नयेत, हे षडयंत्र आहे. हे सर्व ठरवून केले जात असल्याचे ते म्हणाले होते. तर शिवसेनेचे जवळपास सहा खासदारही ईडीच्या रडारवर असून त्यांच्याकडूनही आता भाजपाबरोबर जाण्याची मागणी होत होती.
