मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्याच्या घडीला शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर यांनी देखील या घडामोडीवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात पक्षाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गद्दारांना माफी नाही. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी पाय ठेवून दाखवावा. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, असा प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या आहेत.
काल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शिवसेना भवनाकडे जमा होण्याचे आदेश दिले. यावेळी नितीन नांदगावकर हेदेखील सेना भवनावर दाखल झाले. यावेळी या बंडखोरीवर त्यांनी आपले रोखठोक मत मांडले.
