मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, असा आशावाद व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. मी काल एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर फोनवरून चर्चा केली. आमच्यात अत्यंत चांगल्या वातावरणात चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे माझे फक्त सहकारी नव्हेत तर मित्रही आहेत. आम्ही गेली ३५-४० वर्षे एकत्र काम करतोय. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे असेच नाते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रथम सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आमदारांनी पर्यटन करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ते परत येतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांचे बंड हा उद्धव ठाकरे यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी आखलेला प्लॅन होता का, असा प्रश्न यावेळ संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पाठीमागून वार करत नाही. जे काही करते ते समोरून करते. मी आजच सकाळी शरद पवार यांच्याशी बोललो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्या पाठिशी आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे हे स्वगृही परत येतील. एकनाथ शिंदे यांना शिवसेना सोडणं आणि आम्हाला त्यांना सोडणं, या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसैनिकच म्हणून संपूर्ण आयुष्य काढतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.



