मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांसोबत बंड पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते.मात्र आता ते शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत मुंबईत येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारण शिंदे यांनी विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. मात्र राज्यपालांना कोरोना झाल्याने या घडामोडींना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.