मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मनला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कायम आहे. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आले. सध्या शिंदे हे आमदारांसोबत आसाममधील गुवाहटीत आहेत.
त्याठिकाणाहून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ते भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावाही करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकार कोसळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे काल प्रसार माध्यमांसमोर आले .आपल्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याच्या हालचाली त्यांनी सुरु केल्या. शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र माझ्याकडे जो आमदारांचा गट आहे, तीच खरी शिवसेना आहे, असेही शिंदे म्हणाले.