औरंगाबाद : वृत्तसंस्था
विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडात मराठवाड्यातील सहा आमदारांची नावे समोर येत आहेत. यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसकट, चार कट्टर आमदारांचा समावेश असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांचे बंड व त्यातील एकेक आमदारांची नावे समोर येऊ लागताच वातावरण तापू लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळातील संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांच्यासह औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, वैजापूरचे रमेश बोरणारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सहा आमदार नाॅटरिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये आहेत. मराठवाड्यात शिवसेनेचे (Shivsena) १२ आमदार आहेत त्या पैकी या सहा आमदारांचे फोन लागत नाहीत किंवा ते नाॅटरिचेबल आहेत.
उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ.राहूल पाटील, नांदेडचे बालाजी कल्याणकर, कळमनुरीचे संजय बांगर, औरंगाबादचे (मध्य) प्रदीप जैस्वाल, उदयसिंग राजपूत हे सहा आमदार मात्र शिवसेनेसोबत असल्याचे मानले जात आहे. यातील अनेकांनी स्वतः किंवा त्यांच्या शिवसेनेत असल्याविषयी खात्री दिली आहे.
मुंबईनंतर औरंगाबाद या मराठवाड्यातील राजधानीत शिवसेनेने आपली पाळेमुळे रोवली होती. चंद्रकांत खैरे चार वेळा शिवसेनेचे खासदार होते. संदीपान भुमरे हे मंत्री पाच वेळा पैठणहून निवडून गेले आहेत. संजय सिरसाट हेही निष्ठावंत आमदार मानले जातात. उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हेही तीन वेळ आमदार आहेत. अशा प्रकारे भुमरे, सिरसाट व चौगुले यांचे बंड मराठवाड्यात आश्चर्यकारक मानले जाते आहे.
या तिघांशिवाय शिंदेसोबतच्या यादीत असलेले प्रा. बोरणारे व तानाजी सावंत हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले आहेत. मंत्री सत्तार हे हरहुन्नरी व अविश्वसनीय राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या बंडाविषयी फार आश्चर्य वाटावे अशी स्थिती नाही. या बंड केलेल्यांपैकी सिरसाट, भुमरे व सत्तार यांनी आपापल्या मुलांना राजकारणात सक्षम करत आणले आहे. थोडक्यात ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या कार्यकाळाकडे आहेत.



