जळगाव : प्रतिनिधी
भडगाव तालुकयात दोन वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकून खून करणाऱ्या फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काकनबर्डी येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जितेंद्र उर्फ नाना जंगलू ठाकरे रा. कराब ता. भडगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र ठाकरे याचे पत्नीसोबत वाद झाला होता. या वादातून त्याने त्याची दोन वर्षाची मुलगीला घेवून जावून विहिरीत फेकून दिले. तिला फेकत असतांना परिसरातील नागरीकांनी पाहिले असता जितेंद्र ठाकरेने विहिरीत उडी घेतली. दरम्यान, नागरीकांनी त्याला विहीरीतून बाहेर काढून भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान संशयित जितेंद्र ठाकरे हा फरार झाला होता. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना फरार झालेला संशयित आरोपी जितेंद्र ठाकरे आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. किशोर राठोड, रणजी जाधव, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील यांचे पथक रवाना झाले. सापळा रचून त्याला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.