जळगाव : प्रतिनिधी
पावसाळा सुरु झाला तरी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. जी झाली ती एका पावसात वाहून जातील. त्यामुळे थर्डपार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही मक्तेदाराचे पेमेंट करू नका अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल केली. तर आमदारांना दरवर्षी पाच कोटी विकासनिधी मिळतो. त्यांनी आतापर्यंत एकदाही रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. तो दिला असता तर चित्र वेगळे असते असा मुद्दा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी उपस्थित करीत आ. राजूमामा भोळे यांच्यावर पलटवार केला.
भोळेंनी रस्त्यांसाठी निधी दिला नाही : नितीन लढ्ढा
आमदारांना मतदार संघाच्या विकासासाठी दरवर्षी पाच कोटींचा निधी मिळतो.पाच वर्षात 25 कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी मिळू शकले असते परंतु त्यांनी एकदाही रस्त्यांसाठी निधी दिला नाही. रस्त्यांऐवजी ओपनस्पेसवर पेव्हींग ब्लॉक, हायमास्ट लावणे या कामासाठी निधी खर्च केला असे नितीन लढ्ढा म्हणाले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष उपस्थितीत काल बैठक झाली त्यात लढ्ढा व भोळे या दोघांत जुगलबंदी रंगली. जळगावकर चार वर्षांपासून रस्ते, पाण्यासाठी निरंतर कष्ट घेत आहेत. शहराच्या वाढीव वस्तीत महापालिकेचे पाणी मिळत नाही. त्यांना आमच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची योजना द्यावी का? पावसाळा सुरु होऊन देखील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून देत मक्तेदाराचे पेमेंट रोखण्याची मागणी आमदार भोळे यांनी केली. एका व्यक्तीचा द्वेष करा पण त्याची झळ जनतेला पोहचू देऊ नका. नालेसफाईत बुद्धिपुरस्सरपणे भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहर अभियंत्यांना सूचना
आमदारांनी नालेसफाईबाबत भेदभाव होत असल्याची भावना बोलून दाखवली असता पालकमंत्र्यांनी नूतन शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांना शनिवारीच या प्रश्नावर लक्ष घालून नालेसफाईचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या.
महावितरण कंपनीच्या तक्रारींचा पाढा
महावितरणतर्फे डिमांड नोट भरून रोहित्र जोडून न देणे, ऑइल नसल्याचे उत्तर देणे, अधिकाऱ्यांचे फोन बंद करून ठेवणे, पथ दिव्यांवाबत धोरण निश्चित नसणे असे प्रश्न आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी,आमदार संजय सावकारे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले व पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून ऑईल संपण्यापूर्वी चार दिवस अगोदर आम्हाला सांगा,अशा सूचना दिल्या.



