13 राज्यांमध्ये तणाव; 40 शहरांमध्ये जाळपोळ, 316 रेल्वे प्रभावित

0
21

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरला. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्लीसह १३ राज्यांमध्ये हिंसाचार व निदर्शने झाली. या राज्यांतील ४० हून अधिक शहरांमध्ये दंगली झाल्या. रेल्वे व रस्ते अडवण्यात आले. दगडफेकीत सर्वसामान्य नागरिक अडकले.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू, १३ जखमी झाले. १६४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या. ३१६ विस्कळीत झाल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना रेल्वे मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. हिंसक आंदोलकांबाबत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक म्हणाले की, जाळपोळ आणि हिंसाचार करणारे तरुण सैन्यात भरती होण्याच्या लायकीचे नाहीत.

भरतीची अधिसूचना सोमवारपर्यंत
अग्निपथ योजनेंतर्गत जवानांची भरती सुरू करण्याची अधिसूचना सोमवारपर्यंत जारी हाेईल. तरुणांनी हिंसाचार सोडून आता भरतीसाठी तयारी करावी, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. या वर्षअखेरीस विविध रेजिमेंटमध्ये ४६ हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू हाेईल.

दुसरीकडे, वायुसेनेने सांगितले की भरती प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होईल. चार वर्षांनंतर अग्निवीर निवृत्त झाल्यावर त्याला माजी सैनिक म्हटले जाणार नाही. त्याला माजी अग्निवीर म्हटले जाईल. तथापि, २५% अग्निवीर जे ४ वर्षांच्या पदोन्नतीनंतर नियमित सैनिक बनतील, त्यांना निवृत्तीनंतर माजी सैनिक म्हटले जाईल. आंदोलनात असे तरुणही सहभगी होत आहेत, ज्यांनी दोन वर्षांपूर्वी सैन्यात भरती होण्यासाठी शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या उत्तीर्ण केल्या. परंतु, लेखी परीक्षा बंद असल्याने भरती होऊ शकली नाही. देशभरात असे एकूण १.२९ लाख उमेदवार आहेत. तेदेखील आता केवळ अग्निपथअंतर्गत भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

आंदोलनाला हिंसक वळण
बिहार : वेगवेगळ्या शहरांमध्ये ६ रेल्वे जाळल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला. भाजप प्रदेशा-ध्यक्षांच्या घरावर सिलिंडर फेकले. बिहिया स्टेशन तिकीट काउंटरवरून ३ लाख लुटले. दोन स्कूल बस जाळल्या. १२ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद.
उत्तर प्रदेश : बलियात रेल्वे जाळली,२५० जणांना अटक. अलिगडमध्ये पंचायत अध्यक्षांची गाडी, जेवरमध्ये पाेलिस चाैकी जाळली. आग्रा झोनच्या एडीजींच्या गाडीची काच फोडली.

हरियाणा : गुरुग्रामसह काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू. फरिदाबाद, बल्लभगड, नारनौल, पलवलसह अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद.
दिल्ली : विद्यार्थी संघटनांचे आंदाेलन. अनेक मेट्रो स्थानकांचे दरवाजे बंद. पोलिसांशी चकमक.
मध्य प्रदेश : ग्वाल्हेरनंतर इंदूरमध्ये निदर्शने. रेल्वेस्थानकावर दगडफेक. १५ तरुणांना अटक
हिमाचल : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या बैठकीत गोंधळ.
सिकंदराबाद : आंदोलकांनी ३ रेल्वे जाळल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ४० प्रवाशांना वाचवले.

आंदाेलनाची किंमत
ग्लोबल पीस इंडेक्सनुसार, गेल्या वर्षात भारतात हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये ६४,५८४.२९ दशलक्ष डाॅलर म्हणजेच ५०.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हिंसाचार अस्वीकारार्ह
विरोधाच्या नावाखाली अराजक माजवणे अस्वीकारार्ह आहे. रेल्वेमध्ये जाळपोळ, दगडफेक, रस्ते अडवणे, घरे आणि दुकानांवर हल्ले करणे ही गुन्हेगारी कृत्ये आहेत. तरुणांच्या संतापाची कारणे असू शकतात, पण दंगलीत सहभागी होऊन ते त्यांचे भविष्य बिघडवत आहेत, कुटुंबीयांच्या अडचणी वाढवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here