ताहनगरमध्ये चक्क काळ्या मातीवर करण्यात आले नवीन कॉंक्रिटीकरण

0
16

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
शासनाच्या तिजोरीवर अतोनात आर्थिक भार असताना फैजपूर येथील ताहनगर या वस्ती भागात सुमारे ३१ लाख रुपये खर्चाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम नुकतेच सुरु करण्यात आले.  हे काम चक्क काळया मातीच्या थरावर करण्यात येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. याकडे मुख्याधिकारी साहेब लक्ष देतील काय? असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक मेहबुब पिंजारी यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेने ताहनगर मधील या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले होते. हा रस्ता बर्‍यापैकी सुस्थितीत होता. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईनचे काम या भागात करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता खराब झाल्याने वर्षभरापासून या वस्तीतील रहिवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. संबंधित ठेकेदाराने पाईपलाईन करून त्यावर कोणतेही कॉंक्रिटीकरण केले नाही. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी चिखल आणि खड्डे निर्माण झाले.
सुमारे ३१ लाख रुपये किमतीच्या कॉंक्रिटीकरण काम घेतलेल्या ठेकेदाराने याच रस्त्यावर थातूरमातूर सपाटीकरण करून त्यावर खडीकरण न करता थेट कॉंक्रिटीकरण सुरू केलेे आहेे. त्याबद्दल नगरपालिकेचे अभियंता यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. भविष्यात हा रस्ता टिकेल काय ? शासनाच्या निधीचा हा अपव्यय नव्हे काय?या गंभीर गोष्टीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष करण्याचे कारण काय?असे अनेक प्रश्न नागरिकांना आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविषयी वरिष्ठांनी या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाबाबत चौकशी करावी.त्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करावे अशी मागणी होत आहे.
सावदा व फैजपूर नपाची तुलना
फैजपूर शहरातील नागरिक आता सावदा नगरपालिकेत होत असलेल्या मजबूत व टिकाऊ कामांबद्दल फैजपूर नगरपालिकेच्या विकास कामाबद्दल तुलना करीत आहे. सावदा शहरात होत असलेली कॉंक्रिटीकरण, बांधकाम हे मजबूत व टिकाऊ असल्याचे नागरिक उघड बोलत आहेत मात्र तसाच निधी फैजपूर नगरपालिकेला मिळत असूनही सहा महिन्यातच नव्याने केलेल्या बांधकाम रस्त्याचे बारा वाजतात.हा संशोधनाचा विषय ठऱला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here