जांजगीर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची 106 तासांच्या बचाव मोहिमेनंतर काल रात्री उशिरा सुटका करण्यात आली.बचावानंतर लगेचच त्याला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले.
गेल्या शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहुल 60 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराने हे ऑपरेशन अविरत आणि अथकपणे पार पाडले. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हे देशातील सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे.
खड्ड्यात सापही आला
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. ते राहुलच्या नातेवाइकांच्या संपर्कातही होते. काल रात्री त्यांनी सोशल मीडियावर बचाव कार्याच्या यशाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोहिमेदरम्यान एक सापही खड्ड्यात आला होता पण धोका टळला. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते.राहुलला बाहेर काढताच जवानांनी …भारत माता की जय…च्या घोषणा दिल्या.लोकांनी टाळ्या वाजवून बचाव पथकाचे कौतुक केले. लोकांनी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराच्या जवानांशी हस्तांदोलन केले.
कॅमेराद्वारे निगराणी
पाच दिवसांपासून राहुलवर खास कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत होती. त्याला अन्न आणि पाणी दिले जात होते. उत्साह कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी सतत बोलणे सुरू होते. पाच दिवसांपासून 60 फूट खाली गाडल्यामुळे आणि खड्ड्यात पाणी असल्याने त्याच्या अंगात अशक्तपणा आला आहे.
कसे झाले बचावकार्य?
सैन्याच्या जवानांनी बचावकार्याची सूत्रे हातात घेतली. बोगद्यातून ते आधी बोअरवेल आणि नंतर राहुलपर्यंत पोहोचले.राहुल आत असल्याने वाटेतील खडक ड्रिलिंग मशिनने नव्हे तर हाताने तोडले गेले, त्यानंतर आतील माती काढण्यात आली. एवढी मेहनत घेऊन जवान राहुलपर्यंत पोहोचले. यानंतर राहुलला दोरीने ओढून बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती पाहता रुग्णवाहिका, डॉक्टरांची टीम आणि वैद्यकीय उपकरणे आधीच सज्ज होती. बोगद्यापासून ॲम्ब्युलन्सपर्यंत एक कॉरिडॉर करण्यात आला. राहुलला स्ट्रेचरमधून थेट रुग्णवाहिकेत आणण्यात आले.
मानसिकदृष्ट्या कमकुवत
राहुल बधिर, मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्यामुळे तो शाळेतही गेला नाही, असेही सांगण्यात आले आहे. तो घरीच राहत होता. संपूर्ण गावातील लोकसुद्धा 2 दिवस त्याच ठिकाणी थांबले होते, जिथे मूल पडले होते. राहुल हा त्याच्या आई-वडिलांचा मोठा मुलगा. त्याचा एक भाऊ 2 वर्षांनी लहान आहे. वडिलांचे गावात भांड्यांचे दुकान आहे.