तिसरा टी-20 सामना ः भारत 48 धावांनी विजयी; आफ्रिकेचा धुव्वा

0
84

विशाखापट्टणम ःवृत्तसंस्था
आयपीएलच्या पर्पल कॅप विजेत्या युजवेंद्र चहल (3/20) व युवा गोलंदाज हर्षल पटेलने (4/25) शानदार गोलंदाजीतून यजमान टीम इंडियावरील मालिका पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर केले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. त्यातून भारताने सलग सात पराभवानंतर आफ्रिकेवर मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले.

आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटमध्ये होणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात आफ्रिकेसमोर 180 धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्युत्तरात आफ्रिका संंघाचा 19.1 षटकांत 131 धावांत धुव्वा उडाला.

ऋतुराज-ईशानची विक्रमी भागीदारी
पुण्याचा ऋतुराज गायकवाड (57) आणि ईशान किशनने (54) भारतीय संघाला तारण्यासाठी मोठी खेळी केली. त्यामुळे भारतीय सलामीवीरांच्या नावे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50+ धावांच्या भागीदारीची नोंद करता आली. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करून दमदार पुनरागमन केले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमधील पहिले अर्धशतक आपल्या नावे केले. याशिवाय ईशान किशनने आपला झंझावात कायम ठेवताना मालिकेतील दुसरे अर्धशतक आपल्या नावे केले. त्याने सलामी सामन्यात शानदार 76 धावांची खेळी केली होती. आता तिसऱ्या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजीत प्रिटोरियस चमकला.

ईशान किशनचे चौथे अर्धशतक
फॉर्मात असलेला युवा फलंदाज ईशान किशनने आपला झंझावात कायम ठेवला. यातून त्याने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील चौथे अर्धशतक ठरले. तसेच त्याचे मालिकेतील हे दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय तो आता 23 वर्षांखालील अर्धशतकवीरांच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत ईशान किशन हा चौथ्या स्थानावर आहे. यापूर्वी या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाचा समावेश आहे. या तिघांच्या नावे प्रत्येकी 4 अर्धशतकांची नोंद आहे.
ऋतुराजचा झंझावात
पुण्याच्या ऋतुराजने झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्याने 30 चेंडूत अर्धशतक साजरे केले. यादरम्यान त्याची गोलंदाज नोर्टेजेच्या षटकातील फटकेबाजी लक्षवेधी ठरली. त्याने या षटकात पाच उत्तुंग चौकार खेचले. त्याने 162.85 च्या स्ट्राइक रेटने 35 चेंंडूंत सात चौकार व दोन षटकारांसह 57 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला आता आपल्या नावे पहिल्या टी-20 अर्धशतकाची नोंद करता आली.

हर्षल-चहलच्या गोलंदाजीने संघ विजयी
युवा गोलंदाज हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजीतून भारताची पराभवाची मालिका खंडीत केली. हर्षलने चार व चहलने 3 बळी घेतले. तसेच भुवनेश्‍वर व अक्षर पटेलला प्रत्येकी एक बळी घेता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here