शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ५ जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उद्या अयोध्येला पोहचणार आहेत. काकांच्याआधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, काल विशेष रेल्वेने ठाणे आणि नाशिकहून हजारो शिवसैनिक अयोध्येला निघाले. यावेळी निघताना शिवसैनिकांनी राज ठाकरेंना डिवचणाऱ्या घोषणा केल्या. ‘घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली’, शिवसेना जिंदाबाद, वाघ आला रे वाघ आला अशा घोषणांनी ठाणे रेल्वे स्टेशन दुदुमन गेले होते. तर आता अयोध्येतही आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी आश्याचप्रकाराचे बॅनर झळकले आहेत. ‘असली आ रहा है, नकली से सावधन’ असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.