–सत्ता स्थापनेवेळची रणनीती पुन्हा अमलात, अपक्ष आमदारांची साथ मिळवण्यात यश
-राज्यसभेच्या चारी जागा निवडून येण्याचे स्पष्ट संकेत ;ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन
प्रतिनिधी । मुंबई
दाेन वर्षापूर्वी राज्यात तीन पक्षांच्या सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या आमदारांची एकजूट करण्याची रणनीती आखली होती, त्याचपद्धतीने मंगळवारी (ता.७) राज्यसभा निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्यात आली. अपक्ष व छोट्या पक्षांचे १३ आमदार आज ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.१०) होत असलेल्या सहा जागांच्या निवडणुकीत आघाडीचे ४ सदस्य राज्यसभेवर बिनदिक्कीतपणे निवडुन जाणार असे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील व निवडणूक प्रभारी मल्लिकर्जून खर्गे उपस्थित हाेते. ‘कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. राज्यसभेच्या चारही जागा निवडून आणायच्या आहेत. आपले ऐक्य दाखवा”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना केले. “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दाखवून दिले कसे लढाई लढतात. ती पुरून उरली. त्यांच्याकडेही असेच वातावरण तयार केले होते. आपण लढू आणि जिंकू”, असे मुख्यमंत्री यावेळी आमदारांना उद्देशून म्हणाले.
शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांवर विश्वास व्यक्त केला. ‘या निवडणुकीत कुणीही फुटणार नाही. त्यामुळे आपलेच उमेदवार जिंकून येणार’, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले.
बैठकीला काँग्रेसचे ४४ आमदार येणे अपेक्षित होते. फक्त ३२ आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे ५५ पैकी फक्त ४५ आमदार पोहोचू शकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ पैकी ४२ आमदार बैठकीला आले होते. बैठकीला अपक्ष व छोट्या आमदारांपैकी १३ आमदारांनी उपस्थिती लावली होती. अनेकांना वेळेत पोचता आले नाही, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला. ईडी व पैशाचे अमीष दाखवून घोडेबाजार करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केला.
पवारांनी टोचले कान :
आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून सरकारचे काम केले पाहिजे, अशी सूचना यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत केली. या वक्तव्याने एकप्रकारे पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे कान टोचले.
सुरक्षीतस्थळी आमदार :
१. काँग्रेसचे सर्व आमदार ट्रायडंट हाॅटेलात राहणार आहेत. २. शिवसेनेच्या आमदारांना आज मढ आयलंडच्या रिट्रीट हाॅटेल येथून ट्रायंडला आणण्यात आले. ३. राष्ट्रवादीचे आमदार पवई येथील रेनेसाँ हाॅटेलात ठेवण्यात येणार आहेत.
