रायगड : वृत्तसंस्था
रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो. या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा सोहळा होत आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात – शिवराज्याभिषेक घराघरांत` ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होत आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघाला आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे.
आज सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. शिवरायांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा कार्यक्रमाने सांगता होईल.