जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्ते व जनतेच्या विश्वासाच्या बळावर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, अशी गर्जना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पाळधी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
तीस वर्षांच्या कारकीर्दीत कमवलेली जनतेची ताकद आजही माझ्या पाठीशी आहे. संपर्क ही माझी शक्ती आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता व जनता ही माझे सावकार आहे. त्यांचे प्रेम शब्दातीत आहे. आजही 90 टक्के कार्यकर्ते माझ्या सोबतीला कायम आहेत. मंत्रिपद आज येईल, उद्या जाईल मात्र जनतेची साथ कायम राहणार आहे. जनतेची सेवा करताना अनेकांनी आरोप केले. पालकमंत्र्याला काही कळत नाही, असेही आरोप झाले मात्र आरोप करणारे आता आपल्या मागे फिरत आहेत. तापी निम्म प्रकल्पास दोन वर्षांत 40 कोटी निधीचा उच्चांक केला आहे.आजपर्यंत एकही कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला नसल्याचा अभिमान
आहे.
आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गुलाबराव वाघ, सुनील चौधरी (अंबरनाथ), गजानन पाटील यांनी मनोगतात पालकमंत्र्यांनी केलेल्या विकासकार्याचे कौतुक केले. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, अमर जैन, पवन सोनवणे, गोपाळ चौधरी, गजानन मालपुरे, गजानन डावरे, गुणवंत जैन (मुंबई) आदी उपस्थित होते. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. जनतेला अजूनही वाटते मी मोठ्या पदावर जावे
चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. जनतेचे प्रेम कायम असल्याने मी समाधानी आहे. आमदार, राज्यमंत्री, आता कॅबिनेट मंत्री म्हणून कामे करीत आहे. जनतेकडून मी अजून मोठे पद घ्यावे अशी इच्छा व्यक्त होत आहे मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांच्यापुढे मी जाऊ शकत नाही. जनतेने त्यांना पंतप्रधान करावे. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार मी मुख्यमंत्री होण्यास तयार आहे, असा विश्वासही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत व्यक्त केला.
पाळधीकरांना मिळणार बिसलरीचे पाणी
पाळधी गावात प्रत्येक घरात वर्षभरात बिसलरीचे पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यमंत्री असताना निधी नसल्याने अनेक कामे करता आली नाहीत. मात्र आता निधी कामांची वाट पाहतो आहे. पहिल्यांदा निवडून येणे सोपे मात्र चौथ्यांदा निवडून येणे अतिशय कठीण आहे. त्यासाठी जनतेची साथ असणे आवश्यक असते. ती मला मिळाली आहे. जिल्ह्यात सर्व पदे शिवसेनेकडे आहेत. जिल्हा परिषद बाकी आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.