प्रतिनिधी : जळगाव
आचार्य अत्रे कट्टा ठाणे यांच्या तर्फे दिला जाणारा ‘कृतज्ञता’ पुरस्कार दिव्यांग, अनाथ, आणि वंचित घटकातील तरुणांसाठी पूर्ण वेळ कार्यरत असणारी संस्था दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल व आदिवासी भागातील कार्यबद्दल कृतज्ञता ट्रस्टचे डॉ.राम गोडबोले यांना देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे आणि पितांबरी उत्पादनाचे व्यवस्थापकीय प्रमुख रवींद्र प्रभूदेसाई, आणि कट्ट्याच्या संस्थापिका विदुला ठुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजात विधायक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक कार्यात पूर्णवेळ निस्वार्थपणे वाहून घेतलेल्या संस्थाना हा कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला.सन्मान चिन्ह आणि पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.संस्थेच्या वतीने मनोबलची दिव्यांग विद्यार्थिनी अमृता सूर्यवंशी, दीपस्तंभचे संचालक शैलेश कोलते, आजीवन सदस्य आनंद खोत, श्रीकांत आराध्ये, मानसी महाजन आणि यजुर्वेंद्र महाजन यांनी पुरस्कार स्वीकारला.
ग्रामीण व आदिवासी भागात गुणवत्ता पूर्ण शिक्षण पोहचवण्यासाठी तसेच “ मनोबल “ या प्रकल्पाद्वारे दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांसाठी निवासी, निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रकल्प उभारल्याबद्दल दीपस्तंभ फाउंडेशनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या अवतीभवती अनेक सामाजिक संस्था समाजासाठी चांगले कार्य करीत आहेत.त्यामुळे अश्या संस्थांना कुठल्यातरी निमित्ताने मदत करायला हवी.कारण मदत करत राहणे, म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण दवणे यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.