शहरातील खुनांचे सत्र थांबेना !

0
63

जळगाव : विशेष प्रतिनिधी

गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर किंवा शुक्रवारच्या अगदीच पहाटे शहरातील कासमवाडी परिसरातील मासळी बाजार नजीकच्या मैदानावर सागर वासुदेव पाटील या 27 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला.शुक्रवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला तसा पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि काही तासातच पोलिसांनी दोघा संशयित खुन्यांना ताब्यात घेतले. तद्नंंतर त्या खुनाचा तपास लावण्यात त्यांना म्हणजे पोलिसांना यश आले.गुन्ह्याचा उलगडा व आरोपी निष्पन्न केल्यामुळे तापसाधिकारी व सहकारी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीच पाहिजे. त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.
मात्र ,जर असेच गुन्हे जसे चोऱ्या,घरफोड्या,सोनपोत ओढून पळणे, हातातून महागडा मोबाईल हिसकून पळणे, हाणामाऱ्या,खुनी हल्ले व खून आदी गुन्हे वारंवार घडत असतील ,त्यांच्यावर नियंत्रण होत नसेल,गुन्हेगारांवर वचक बसत नसेल किंबहुना गुन्हेगारांवर पोलिसी खाक्याचा कोणताच परिणाम होत नसेल,तर त्यालाही पोलीस यंत्रणाच जबाबदार धरली पाहिजे.कोणत्याही घटना अथवा गुन्हे सातत्याने घडत असतील आणि त्यावर प्रतिबंध लावण्यात संबंधीत यंत्रणेला यश येत नसेल तर यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष आहे असेच धाडसाने म्हणावे लागते.
शहरातील कोणत्या भागात अथवा परिसरात गुन्हेगारांची,टवाळखोरांची किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची रेलचेल आहे हे शहरातील सर्वसामान्य माणूस सहजपणे जाणतो.आणि पोलिसांकडे तर आजमितीस अत्यंत अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. फक्त एका क्लिक वर कोणत्याही गुन्हेगाराची कुंडली त्यांच्यासमोर येते.त्यामुळे कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणते सराईत गुन्हेगार आहेत.रेकॉर्डवरील गुन्हेगार कोण याबद्दल पोलीसदादांकडे इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.ही खूपच महत्वाची व अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
तरीही येथील म्हणजे शहरातील तुकाराम वाडी,कासम वाडी,गणेश वाडी,जानकी नगर,ईश्वर कॉलनी,सुप्रीम कॉलनी,गणेशवाडी बगीचा ,शनीपेठ परिसर ,पिंप्राळा -हुडको, शिवाजी नगर हुडको आदी भागात गुन्हेगारी फोफावतेच कशी? त्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे? हे प्रश्न आपोआपच उपस्थित होतात.
वास्तविक सागर पाटील ह सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असल्याची माहिती मिळते.तो एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची व सद्यस्थितीत तो पॅरोलवर मुक्त असल्याचीही माहिती मिळते.म्हणजेच सागर हा साधा-सरळ तरुण नव्हता.गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने त्यांचीही कुंडली पोलिसांकडे असावीच आणि उल्लेखनीय की,सागरचा खून ज्या ठिकाणी झाला त्याच परिसरात यापूर्वी काही खुनाच्या घटना घडल्या आहेत.अलीकडेच दोन वर्षांपूर्वी श्‍्याम दीक्षित नावाच्या तरुणाचा खुन याच परिसरात नोंदविण्यात आला आहे.
शहरातील गुन्हेगारी बहुल भाग म्हणून कासम वाडी-मासुमवाडीशी संलग्न असलेला हा भाग असून शनिवारचा साप्ताहिक बाजार,मासळी बाजार याच मोकळ्या मैदानावर भरतो आणि हेच मैदान टवाळखोरांचा अड्डा बनला आहे.रात्री-बेरात्री येथे गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा मेळा भरलेला असतो.त्यात कुणाचा वाढदिवस असला की. तेथेच गुंडांच्या भाऊगर्दीत -नशेच्या गर्तेत केक कापला जातो.तलवारीने केक कापण्याचे प्रकार या ठिकाणी झाल्याचे सांगतात.पण त्याबद्दल परिसरात प्रचंड दहशत आहे.क्षुल्लक कारणावरून मग दोस्ता-दोस्तात शाब्दिक चकमक होते,त्याचे पर्यवसान हाणामारीत व नंतर कुणावर तरी खुनी हल्ला होतो.सागरचा खून फक्त उसनवारीच्या पैशांवरून झाल्याचे समोर आले आहे.
असाच खून गेल्या आठवड्यात अनिकेत गायकवाड या तरुणाचा झाला.त्याने प्रेम प्रकरणाची माहिती दिली होती म्हणे.तुकाराम वाडीतल्या ओतारी नामक तरुणाचाही असाच खून झाला.तुकाराम वाडी व कासमवाडी लागून आहे. तेथील चौधरी व राठोड गटात घरांवर हल्ले करणे ते खुनी हल्ल्यापर्यंत प्रकार झाले.त्यांनतर तुकाराम वाडीतील झगड्यात जखमी तरुण जिल्हा रुग्णालयात दाखल असतांना दुसऱ्या गटाने रुग्णालयाच्या गेटवरच हल्ला केला.
गणेशवाडी परिसरात तुकाराम वाडीला लागून असलेल्या चौधरी यांच्या मोकळ्या प्लॉटवर (बंद विहीर व चिंचेच्या झाडाजवळ) गुंड-गुन्हेगारी प्रवृत्तीचा कायमच डेरा असतो.तेथे जोरजोरात बोलणे,अर्वाच्च शिवीगाळ ,जाणारा-येणारांकडे खुनशी नजरेने पाहणे असे प्रकार सर्रास सुरु असतात.तेथे दारूच्या बाटल्या ढोसणे व त्या तेथेच फोडण्याचे प्रकार होतात.त्याच जागी कोंबडी-मटण शिजवून खाल्ले जाते.त्याची परिसरात प्रचंड अशी दहशत आहे.
सांगण्याचे तात्पर्य हे की,इतके सारे गुन्हे घडून, गुन्हेगारी प्रवृत्तीची दहशत व हैदोस असतांना पोलीसदादा तिकडे दुर्लक्ष का करतात ? गणेशवाडी,तुकारामवाडी,कासमवाडी,मासुमवाडी,जानकी नगर,ईश्वर कॉलनी हा परिसर गुन्हेगारी बहुल म्हणून नावारूपास आलेला आहे.त्यातील बऱ्याच गुन्हेगार मंडळींचे लाडू गँग, आबा गँग,शिव शंभो नारायण या टोळ्यांशी कनेक्शन असल्याचे म्हणतात.हा परिसर बहुतांशी औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे अंतर्गत येतो.
हा परिसर गुन्हेगारीमुक्त करायचा असल्यास पोलीसदादांनी खरे तर वॉश आऊट मोहीम येथेच राबवायला हवी.पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे,अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी,सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी विशेष करून याच भागातील गुन्हेगारांचा नायनाट केला पाहिजे.संपूर्ण परिसर आज गुन्हेगार-गुंडांच्या दहशतीत आहे.हा परिसर दहशतमुक्त व्हावा हीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here