जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंविरुद्ध ईडीने सुरू केलेल्या कारवाईबाबत प्रथमच खासदार रक्षाताई खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. ईडीच्या दृष्टीने ते योग्य असले तरी आम्हाला ही कारवाई योग्य वाटत नाही.हा विषय न्यायालयात असल्याने जो निर्णय येईल तो मान्य असेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी खासदार खडसे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या कारवाई संदर्भात प्रथमच आपले मत व्यक्त केले.केंद्राला एजन्सी या नात्याने ईडीची कारवाई योग्य वाटत असेल परंतु आम्हाला ती मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राला त्यात तथ्य वाटते त्या पध्दतीने ती कारवाई केली जाते. हा विषय न्यायालयात असून आपण न्यायालयाला मानणारे लोक आहोत. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. संपत्ती जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशाने झाल्याचे विचारताच त्यापेक्षाही वरचे कोर्ट असल्याचे खासदार खडसे म्हणाल्या.
भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश््याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, महेश जोशी, दीपक साखरे, मनोज भांडारकर आदी पज्ञकार परिषदेला उपस्थित होते.