चाळीसगाव/प्रतिनिधी
ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून तेरा हेक्टर पडीक ओसाड ग्रामपंचायत क्षेत्रावर टप्याटप्याने पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते, जलमित्र, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून होत आहे. ज्यात वृक्षारोपणाबरोबरच जलसंधारणाचे त्रिस्तरीय उपचारही केलेले आहेत. यात तलाव, रिचार्ज शाफ्ट, झिरपा कुंभ, भैरो कुंभ, सिसिटी हे उपचार करण्यात आलेले आहेत. झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या व इतरही दात्यांच्या आर्थिक मदतीने या परिसरात ईलेक्ट्रिक पंपसेट, बोअरवेल व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक पर्यावरणपुरक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. ०१ जून रोजी चाळीसगाव येथील सायकल ग्रुपच्या सदस्यांनी चाळीसगाव हून अठरा किमी सायकलने प्रवास करत भेट दिली. तसेच यावेळी सायकल ग्रुपचे सदस्य चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील, भूषण एडके, रवींद्र पाटील, रुणजा पाटील, जलमित्र परिवाराचे प्रा.आर. एम. पाटील व किमया ग्रुपचे शालिग्राम निकम या सर्वांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वडाच्या झाडांचे रोपण टेकडी परिसरात केले. तसेच ज्यांच्या निसर्गबेट या संकल्पनेच्या धर्तीवर ही निसर्गटेकडी साकारली जात आहे ते पुणे येथील भूजलतज्ञ, सहज जलबोधकार श्री उपेंद्रदादा धोंडे यांचे निसर्गबेट हे पुस्तक जलमित्र परिवारातर्फे श्री. के.के. पाटील साहेब यांना भेट देण्यात आले. टेकडीच्या संवर्धनासाठी सायकल ग्रुपतर्फे यावेळी ₹५१०० ची आर्थिक मदत देण्यात आली.
याप्रसंगी सायकल ग्रुपचे सर्व सदस्य, जलमित्र परिवाराचे शशांकभाऊ अहिरे, प्रा. आर.एम.पाटील, कुणालभाऊ रुईकर, पर्यावरण प्रेमी शालिग्राम निकम, आप्पा भालेराव, ब्राम्हणशेवगे येथील मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, नाना माळी, विजय राठोड उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ माळी, सुत्रसंचालन शालिग्राम निकम सर तर आभार शशांकभाऊ अहिरे यांनी मानले.