जळगाव ः प्रतिनिधी
महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. कॅरीबॅगचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांवर 1 जूनपासून कारवाई सुरू केली आहे. एमआयडीसीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग तयार करणाऱ्या हिंदुस्तान इंडस्ट्रीजची काल तपासणी करण्यात आली. त्यात साठा आढळून आल्याने कंपनीला सील ठोकण्यात आले आहे.
आठवडाभरापुर्वीच व्यावसायीकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले होते. 1 जूनपासून कारवाईचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या नेतृत्वात एमआयडीसीतील डब्ल्यू 16 सेक्टरमध्ये जगदीश लिलाराम भारवानी यांच्या हिंदुस्तानइंडस्ट्रीजची तपासणी करण्यात आली. तेथे पथकाला 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या. त्यांचा नर्सिंग व कृषी कामासाठी वापर होत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे पथकाने कंपनीला सील ठोकले.
आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर, सतीश ठाकरे, नाना कोळी, संजय हरी पाटील, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, शेखर ठाकूर, दीपक कोळी आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.



