जळगाव : प्रतिनिधी
मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या वाडःमय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार 2022” अमरावती येथील कवी पवन नालट यांना त्यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय` या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. तर “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खान्देशस्तरीय वाडःमय पुरस्कार 2022` उषा हिंगोणेकर यांना ‘धगधगते तळघर` व लतिका चौधरींच्या ‘माती` काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते.त्यांच्या या योगदानाला स्मरुन प्राचार्य किसन पाटील सरांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून दरवर्षी वाडःमय पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जळगाव जिल्हा शाखेतर्फे पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी आलटून पालटून एका वाडःमय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात.
या वर्षीच्या पुरस्कारांसाठी सन 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहांचा विचार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा यांच्या वतीने लवकरच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद पाचोरा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य भि.ना. पाटील व कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी कळवले आहे.
निवड समितीत प्रा. डॉ. आशुतोष पाटील (जळगाव) व डॉ. संजीवकुमार सोनवणे (धरणगाव) यांचा समावेश होता.राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे.



