जळगाव ः प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करा, अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरेल, असा इशारा माळी महासंघाच्या संपर्क अभियानानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला. राजकीय आरक्षणासाठी गठीत समर्पित आयोगाच्या कार्यप्रणालीवर माळी महासंघाचा आक्षेप असल्याने संघर्ष करण्याचा नाराही त्यांनी या निमित्ताने दिला.
माळी महासंघाने 15 मेला नागपूरपासून महाराष्ट्रभर संपर्क अभियानाला सुरुवात केली. ही जनसंपर्क यात्रा गुरुवारी जळगावात पोहोचली असता राष्ट्रीय अध्यक्ष ठाकरे यांनी राज्य शासनाने राजकीय आरक्षणासाठी स्थापित केलेल्या समर्पित बांठिया आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले. या प्रकरणात सरकारने लक्ष घालून समर्पित आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढाई लढेल असा इशारा त्यांनी या निमित्ताने दिला.
महासंघाच्या संपर्क अभियानात माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, राष्ट्रीय सचिव कैलाश महाजन, शुभम थोरात, अनुप माळी, भूषण माळी, कृष्णा माळी, प्रशांत महाजन, नंदू पाटील व माळी समाज बांधव उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र
या सभेत माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी, कार्याध्यक्ष नंदू पाटील माळी, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत महाजन, नाशिक विभाग महिला अध्यक्षा नगरसेविका सरिता नेरकर, विभागीय सरचिटणीस निवेदिता ताठे, विभागीय उपाध्यक्ष संध्या महाजन, जळगाव महानगर अध्यक्ष सोनाली देऊळकर, विभागीय उपाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर माळी,गणेश माळी,विवेक महाजन, पवन माळी, दीपक माळी, किरण महाजन, सचिन माळी, ईश्वर चौधरी, शरद मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.