देशात नवीन रोजगार संधींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) २०२१-२२ या वर्षात १ कोटी २२ लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. संघटीत क्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी २२ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्याआधी २०२०-२१ या वर्षात ७७ लाख १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. २०१९-२० या वर्षात ७८ लाख आणि २०१८-१९ या वर्षात ६१ लाख १० हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. विशेष म्हणजे जानेवारीपासून रोजगार निर्मितीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च २०२२ मध्ये देशभरात १५ लाख ३० हजार नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत त्यात १९.५ टक्के वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात १२ लाख ८० हजार रोजगार निर्माण झाले होते.
ईपीएफओमध्ये नोंदणी करणाऱ्या आस्थापनांची संख्या देखील वाढली असल्याचे दिसून आले आहे. ‘ईपीएफओ’कडे मार्च महिन्यात १ लाख १८ हजार आस्थापनांनी पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी ‘पीएफ’चा भरणा केला. फेब्रुवारीत ७८ हजार १३३ आस्थापनांनी ‘पीएफ’ची वजावट केली होती. मार्च महिन्यात नोकरी मिळवण्यात २०-२५ वयोगटातील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.