जळगांव प्रतिनिधी
परिवर्तन जळगाव संस्था ही उत्तम अशी नाट्यसंस्था असून त्यांनी निर्माण केलेले व मुंबईत सादर केलेले कार्यक्रम परिवर्तन कला महोत्सव ही खान्देशाची ओळख आहे असे मत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत आयोजित परिवर्तन कला महोत्सवाच्या समारोप सत्रात केले. या तीन दिवशीय कला महोत्सवाचा समारोप शंभू पाटील लिखित अमृता साहिर इमरोज नाटकाने करण्यात आला. परिवर्तन कला महोत्सव जयंत पवारांना समर्पित असल्याने एक छोटेखानी चर्चा समारोपाप्रसंगी घेण्यात आले. याप्रसंगी दिपक राजाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात आजच्या काळात जयंत पवारांच्या साहित्याची व विचारांची गरज असल्याचे नोदंवत सारं अंधारून आलं असलं तरी पवारांचे लेखन समकालीन व संवेदनशील कलावंतांना प्रकाश देत राहील असे मनोगत व्यक्त केले.
प्रा. मंगेश बनसोड यांनी पवांच्या नाट्यप्रवासाचे विश्लेषण करत असतांना या काळातील त्यांची उणीव प्रकर्षाणे जाणवत असल्याचे नमुद केले. तर अभिनेते अक्षय शिंपी यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबतची भूमिका मांडतांना परिवर्तन सारख्या संस्था नाटक जिवंत ठेवण्यासाठी काम करतात व महाराष्ट्रभर महोत्सव करतात हे चळवळीसाठी महत्वाचे आहे.
याप्रसंगी भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते, जेष्ठ लेखक अशोक शहाणे, अच्युत गोडबोले, अभिनेते किशोर कदम, ठाण्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी मान्यवर उपस्थितीत होते. महोत्सवाचा समारोप शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज नाटकाने करण्यात आला.
अमृता प्रितम यांच्या साहित्य, जीवन यासोबतच साहिर लुधियान्वी, चित्रकार इमरोज यांच्या प्रेमाविषयीची अनोखी मांडणी नाटकातून करण्यात आली आहे. हर्षदा कोल्हटकर यांनी उभी केलेली अमृता प्रेक्षकाच्या मनात स्थिरावणारी होती. जयश्री पाटील यांनी अमृताच्या आयुष्यातील लेखिका म्हणून भुमिका साकारली. तर शंभू पाटील यांनी आपल्या अभिनयातून साहिर, इमरोज, प्रितमसिंग यासह अनेक पुरूष ताकदीने रंगमंचावर उभे केले. प्रेक्षकांना मनातून हलवणारा, अवाक करणारा हा नाट्यप्रयोग सर्वांना भावला. याप्रसंगी सभागृहात नाट्यलेखक शफाअत खान, अभिनेते नंदु माधव, युवराज मोहिते, चिन्मयी सुमित, मिलींद जोशी, मुंबईच्या पोलिस आयुक्त गिता चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे आयोजन अभिनेते संदिप मेहता, अक्षय शिंपी, विणा जामकर, अभिजीत झुंझारराव, श्रीनिवास नार्वेकर यांनी केले होते. महोत्सवासाठी राहुल निंबाळकर, अक्षय नेहे, मंगेश कुलकर्णी, सुजय भालेराव, प्रतिक्षा कल्पराज, अविरत पाटील यांनी मेहनत घेतली.