भुसावळ ः प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंगे, मनसे-शिवसेनेच्या सभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण होत असल्याची देखील भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. यासंदर्भात भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. तसेच, त्यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे.
भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थिती लावली होती.या कार्यक्रमात व्यासपीठावरून देखील यासंदर्भात टीका केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. एकमेकांवर टिका-टिप्पणी करत हा बोलला की, त्याला उत्तर दे, तो बोलला की, त्याला उत्तर दे असे सुरू आहे. अगदी खालच्या स्तरावर टीका-टिप्पणी सुरू आहे. गेल्या 40 वर्षांत मी असं काही अनुभवलं नव्हतं”, असे खडसे यावेळी म्हणाले.
“हा सगळा माथी भडकवण्याचा प्रकार”
दरम्यान, याआधी व्यासपीठावरून बोलताना देखील खडसेंनी यावरून निशाणा साधला. “महाराष्ट्रात सध्या वातावरण वेगळे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात असे राजकारण सुरू आहे की, ज्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होतो. सदावर्ते आले की त्यांचीच 15-20 दिवस चर्चा असते, हनुमान चालीसेचा मुद्दा काही दिवस चालतो.नंतर भोंग्याचा मुद्दा काही दिवस चालतो. आता कधी उद्धव ठाकरेंचे भाषण होते,मग राज ठाकरेंचे भाषण होते. कधी नारायण राणेंचे भाषण होते, कधी देवेंद्र फडणवीसांचे भाषण होते. मी कुणाच्या भाषणावर टीका-टिप्पणी करणार नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलं नाही.गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी असे वातावरण पाहिले नाही. हा माथी भडकवण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या खालच्या स्तरावरचे राजकारण मी आजपर्यंत नाही पाहिले”, असे खडसे म्हणाले.