धुळे/ जळगाव ः प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गवर धुळ्यातील मित्रनगर भागात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. मागून येणाऱ्या मालमोटारीने रिक्षाला धडक दिल्यामुळे नियंत्रण सुटून ही रिक्षा समोरून येणाऱ्या क्रूजरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की,यामध्ये रिक्षा आणि क्रूजरचा अक्षरश: चुराडा झाला.अपघातातील क्रूजरमधील प्रवासी पारोळा तालुक्यातल्या तरडीहून पुण्याला लग्नासाठी निघाले होते अशी माहिती मिळाली आहे.
नेमके काय घडले?
काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मालेगावहून मध्यप्रदेशच्या दिशेने कांदा भरून नेणाऱ्या एका मालमोटारीने रस्त्यावर समोर असलेल्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली.यामुळे रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूजरवर जाऊन आदळली. यात ॲपे रिक्षा आणि क्रूजर गाडीचा चुराडा झाला. या अपघातात सरलाबाई पंडित सोनवणे (वय 29), रिक्षा चालक रईस शेख व महेंद्र चुडामण पाटील (वय 51) सर्व रा. तरडी (ता.पारोळा जि. जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांच्या मदतीने जखमींना तत्काळ धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यात आली.
अपघातातील जखमींची नावे
विद्या भूषण कानडे (वय 21), सुरेश नारायण सोनवणे (वय 60), ताराबाई अशोक वसरे (वय 50), सुपडू बारकू वसरे (वय 55), कोयल प्रमोद सोनवणे (वय 12), वसंत पंडित वंजारी (वय 33), प्रमोद रमेश सोनवणे (वय 45), सुधीर अभिमान पाटील (वय 54 ) आणि अरुणाबाई प्रमोद पाटील (वय 45).