ग.स.च्या अध्यक्षपदी ‘सहकार’चे उदय पाटील (व्हिडिओ)

0
10

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग.स.) सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार गटाचे उदय पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर उपाध्यक्षपदी सहकार गटाचेच रवींद्र सोनवणे यांचा विजय झाला. लोकसहकार व प्रगती गटातर्फे अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. निकाल घोषित होताच सहकार गटाच्या संचालकांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. रावसाहेब पाटील यांना लोकसहकार गटाने एकत्रीत येत पाठिंबा दिला होता. मात्र दोन संचालक फुटल्याने या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली व सहकार गटाने बाजी मारली. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ग.स. सोसायटी परिसरात लोकसहकार पॅनलचे दोन संचालक फुटल्याने एकच गोंधळ उडाला व लोकसहकारच्या गटातील काही समर्थकांनी सहकार गटात सहभागी झालेल्या फुटीर संचालकांना अश्‍लिल शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. पोलिस यंत्रणा आल्यानंतर वातावरण शांत झाले व निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेपूर्वी सहकार पॅनलच्या संचालकांसोबत लोकसहकार व प्रगतीचे दोन सदस्य आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी लोकसहकारच्या काही समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर प्रचंड पोलिस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व 9 संचालक व लोकसहकारचे दोन सदस्य सभागृहात सामील झाले. या दोन फुटीर सदस्यांमध्ये भडगावाचे रवींद्र सोनवणे व जळगावचे ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचा समावेश असल्याचे वृत्त असून त्यास लोकसहकारचे प्रमुख मनोज पाटील यंनीही दुजोरा दिला. त्यामुळे सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी विरोधकांना जोरदार हादरा दिल्याचे दिसून आले. या नाट्यमय घडामोडीमुळे ग.स. च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सहकारचे वर्चस्व राहील, असे चित्र स्पष्ट झाले.

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी 1 वाजता सोसायटीच्या बळीराम पेठेतील कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा ज्लिहा उपनिबंधक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 1 ते 1.15 पर्यंत नामनिर्देशन भरले गेले. त्यानंतर 10 मिनिटे नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली व दुपारी 1.30 वाजता अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची अंतिम नावे ेजाहीर करण्यात आली. दुपारी 1.45 पर्यंत अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर दुपारी 2 ते 2.30 दरम्यान गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेण्यात आले व त्यानंतर मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या ग.स.च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नव्हते. सहकार गटाला 9 जागा तर लोकसहकार व प्रगती गटाला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या होत्या. काल लोकसहकार व प्रगती गटाने एकत्रीत येत अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला होता तर दुसरीकडे सहकार गटाने लोकसहकार व प्रगती गटाचा प्रत्येकी एक संचालक फोडल्याचा दावा करून आमच्याच गटाचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ग.स.च्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here