जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या पंधरवड्यापासून उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या जळगावकरांसाठी मे महिन्यातील प्रत्येक दिवस उष्णतेची नवीन आव्हाने घेऊन येत आहे. काल बुधवारी जळगावात सकाळी 10.45 वाजताच तापमान तब्बल 40 अंशांवर पोहोचले होते. या वेळेत उष्ण वाऱ्यांचा वेगही ताशी 14 किलोमीटरवर असल्याने एरवी 12 ते 1 वाजेनंतर जाणवणारा उन्हाचा चटका 11 वाजेपूर्वीच हैराण करणारा ठरला. दुपारी 2 वाजता 45.2 तर रात्रीसुध्दा तापमान 30 अंशांवर होते.
बंगालचा उपसागर व अंदमान बेटाजवळ समुद्रात असलेल्या असनी चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील उष्णतेच्या लाटेवर होत आहे. विदर्भ व खान्देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. समुद्रातील वादळामुळे हवेतील बाष्प शोषले जात असल्याने उत्तर महाराष्ट्रात आर्द्रता घटली आहे. हवेतील कोरडेपणा वाढल्याने उष्ण वारे लाट अधिक तीव्रता वाढवत आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात एरवी दुपारी 12 ते 1 वाजेनंतर जाणवणारी उष्णता सकाळी 10 वाजेपासूनच चटका देत आहे.
दोन दिवस पावसाची शक्यता
बुधवारी दुपारी 4 वाजेनंतर पूर्वेकडील भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 70 टक्के वातावरण ढगाळ होऊनही उष्णता विक्रमी पातळीवर होती. वेगाने वाहणारे उष्ण वारे नागरिकांना हैराण करणारे ठरले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा परिणाम म्हणून खान्देशात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. या काळात तापमान मात्र 45 अंशांवरच स्थिर असेल. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जातो आहे.
मे महिन्यात उष्णतेचा कहर
यंदा एप्रिलचा उत्तरार्ध व मे महिन्याचा पूर्वार्ध दोन्हीही प्रचंड उष्णतेचे ठरले आहे. तापमान सातत्याने वाढते असल्याने जनजीवन विस्कळीत झालेे. गेल्या वर्षी 11 मे रोजी 42.2 तापमान होते. ते यंदा तीन अंशाने वाढलेले आहे.
वाढत्या तापमानाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, रात्रीदेखील उन्हाच्या झळा जाणवत आहे. शहरात उन्हामुळे उकाड्यात वाढ झाली असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे उन्हात अधिक वेळ वावरणाऱ्या अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या आहे. तीव्र उन्हाने उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. चक्कर येणे, थकवा, मळमळ, उलटी, अस्वस्थ वाटणे या रुग्णांत वाढ झाली आहे.