तरुणाला दारू पाजून फेकले छतावरून खाली

0
32

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (वय ३२, रा. नाथवाडा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेश याचा अपघात नसून तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिरयानी व दारु घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. याठिकाणी दारु पिता अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले होते. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता.

मुकेश खाली पडल्यानंतर अमर व पराग हे दोघेही स्वत: पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश हा तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. याप्रकरणी सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. अमर उर्फ लखन शांताराम बारोट वय २९ रा. कासमवाडी, रचना कॉलनी, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे वय २३ न्यू. सम्राट कॉलनी व निखिल राजेश सोनवणे २२ कुसुंबा ता. जळगाव अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लागली होती. यात गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करतांना, एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आले. दोघेही संशयितांची नावे निष्पन्न केल्यावर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी संशयितांच्या शोधार्थ रवाना झाले. गुन्हे शोध पथकातील भास्कर ठाकरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सेवा बजावली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित हे एमआयडीसी हद्दीतील असल्याने त्यांनी बातमीदार कामाला लावले. बातमीदाराने दोघेही संशयित सम्राट कॉलनीत असल्याची पक्की खबर दिल्यानंतर भास्कर ठाकरे यांनी तत्काळ दुचाकीवरुन घटनास्थळ गाठत अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांना ताब्यात घेतले. ठाकरे यांनी वरिष्ठांना संशयितांबाबत माहिती दिली. व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानुसार पोलीस निरिक्षक विजयसिंग ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, उमेश भांडारकर, योगेश पाटील, गजानन बडगुजर, रतन गिते, प्रफुल्ल धांडे, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने संशयितांना पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात आणले. शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच अमर व पराग या दोघांनी निखील रमेश सोनवणे यांच्या सांगण्यावरुन मुकेशला मारल्याची कबूली दिली. त्यानुसार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ माहिती काढत गोलाणी मार्केटमधून निखील सोनवणे याच्या मुसक्या आवळल्या. अनैतिक संबंधांच्या प्रकारातून मुकेशचा काटा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्ह्यात खूनाचे कलम लावण्यासह पोलिसांची कारवाई सुरु होती. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here