जळगाव ः प्रतिनिधी
घरपट्टी भरलेली नसेल किंवा अन्य काही कारणांनी जर तुमच्या घराची नळजोडणी अमृत योजनेवर करायची राहिली असेल तर आज तुमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. कारण महापालिकेने जुन्या पाणीपुरवठा योजनेवरून नव्या वितरण व्यवस्थेवर नळजोडणीसाठी 6 मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. लगेच दोन दिवसात म्हणजेच 8 मे पासून जुनी पाणीपुरवठा वितरण व्यवस्था बंद केली जाणार आहे. सोमवारपासून नव्या वितरण व्यवस्थेवरुन पाणी मिळणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेवर जोडणीसाठी निवास असलेल्या भागातील मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील आठव्या मजल्यावर असलेल्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा लागेल.
शहरात 1 लाख 18 हजार मालमत्ता
शहरात 1 लाख 18 हजार मालमत्ता आहेत. पूर्वी जे नळ कनेक्शन देण्यात आले होते ते अमृत पाणीपुरवठा योजनेवर हस्तांतरीत करावे लागणार आहे. एकदा का रस्ते झाले तर ते नंतर फोडण्याची वेळ येऊ नये म्हणून महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मनपातर्फे सांगण्यात येत आहे.
अद्याप 20 हजार कनेक्शन देणे बाकी
जुन्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर 72 हजार कनेक्शन आहेत. त्यात तीन हजार नवीन वाढले. त्यामुळे ही संख्या 75 हजारपर्यंत जाईल. त्यापैकी 55 हजार कनेक्शन मार्च अखेर दिलेले आहेत. आता 20 हजार कनेक्शन देणे बाकी आहे. ज्यांचे कनेक्शन घेणे बाकी आहेत. त्यांनी तातडीने जोडणी करून घ्यावी.
– गोपाळ लुल्हे,
पाणी पुरवठा अभियंता, महापालिका