जळगाव : प्रतिनिधी
पुढीत दोन दिवसात सर्व धार्मिक स्थळांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवल्यास पाच लाखांपर्यंतच दंड व गुन्हा दाखल होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. आजपर्यंत पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या 608 मशीद, 370 मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडले आहे. जिल्हा पोलिस दलाने आतापर्यंत 150पेक्षा अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलिस प्रशासनाने राबविले आहे.
डीजेच्या संदर्भात स्पष्टीकरण नाही
बंदीस्त सभागृहात लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी लागणार नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, लग्न आदी कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. डीजेच्या संदर्भात स्पष्टीकरण नाही. केवळ लाऊडस्पीकरची परवागनी व ध्वनी प्रदुषणाचे नियम मोडणे याच आधारावर कारवाई केली जाणार आहे. असेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.
पोलिसांचे पथक
करणार थेट कारवाई
ध्वनी प्रदूषणाचा नियम मोडल्यास, विना परवानगी लाऊडस्पीकर वाजवल्यास मुंबई पोलिस ॲक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर परवानगी घेऊन लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांसाठी नियम आहेत. त्यांचा भंग केल्यास पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन संबधितांना पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. पोलिसांना नॉइज लेव्हल मिटर देण्यात येणार आहे. त्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर कारवाईस सुरूवात केली जाईल. असेही डॉ. मुंढे यांनी सांगीतले.



