जळगाव : प्रतिनिधी
भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव काल शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे या जन्मोत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता रथ चौकातून शोभायात्रेला सुुरुवात झाली. या आधी ग्रामदैवत राम मंदिरात बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांच्या हस्ते आरती झाली.
फुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान परशुरामांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यासह शोभायात्रेत श्रीमंत बाजीराव पेशवा ढोल पथक व स्वतंत्रता संग्राम विरांगना राणी लक्ष्मीबाई असे दोन ढोल पथक सहभागी झाले होते. दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी 50 ढोल व 10 ताशांचा समावेश होता. यासह महिलांचे लेझीम पथक तलवार, लाठ्या-काठ्या, दांडपट्टे इत्यादी चे प्रात्यक्षिके हे शोभायात्रेचे वैशिष्ट ठरले. दाणाबाजारातील पीपल्स बँकेजवळ महाआरती झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भेोळे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आमदार चंदू पटेल, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, माजी खासदार ए. टी. पाटील, सतीश पाटील, सुनिल महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, कैलास सोनवणे, ब्राह्मण महासंघाचे श्रीकांत खटोड,लेखराज उपाध्याय,सुरेंद्र मिश्रा,संजय व्यास,विश्वनाथ जोशी,राजेश नाईक,राजाभाऊ जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महिलांचे लेझीम पथक ठरले खास आकर्षण
शोभायात्रेत ‘जय परशुराम जय जय परशुराम’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच …जब जब ब्राह्मण बोला है राजसिंहसन डोला है, गो माता के रक्षक है… या सारख्या घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला. युवकांचे ढोल पथकांचा निनाद करण्यात आला. सर्वच समाजबांधवांनी नृत्याचा ठेका धरला. महिलांचे लेझीम पथक खास आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी लेझीम सादर केले. ब्राह्मण समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, थोर समाजसुधारक आदींच्या वेशभूषा लहान मुलांनी साकारत लक्ष वेधले होते. यावेळी लहान मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. बालगंधर्व नाट्यगृहात शोभायात्रेचा समारोप झाला. आरती होऊन महाप्रसादाचा अनेकानी लाभ घेतला.
जन्मोत्सवाकरीता 500 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी दीड महिन्यापासून तयारी सुुरु केली होती. उत्कृष्ठ नियोजनाबद्दल बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर व बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा मनिषा दायमा यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासाठी विविध समित्यांच्या सदस्यांनी नियोजन केले.