मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी काल आपल्या उत्तर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषर घेत उत्तर दिले आहे. राज्य सरकारला कुणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. ती ताकद या देशात फक्त फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, असे राऊत यांनी सुनावले. तसेच, काल ठाण्यात वाजलेला भोंगा हा भाजपचाच होता. भाजपला महाविकास आघाडीविरोधात सरळ राजकारण करता येत नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना पुढे आणल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
हिंदुत्व आमच्या रक्तात!
हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. ज्यावेळी हिंदुत्वावर हल्ला झाला तेव्हा फक्त शिवसेना समोर आली होती. आता महाराष्ट्रात जे लोक आमच्याशी समोरासमोर लढू शकत नाही, ते इतरांना समोर आणत आहेत. ईडीकडून अभय मिळाल्यामुळेच भाजपच्या इशाऱ्यावर ते आता आमच्याविरोधात भोंगा वाजवत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
कितीही भोंगे वाजवले तरी उपयोग नाही!
केवळ वैफल्येतून, निराशेतून आमच्याविरोधात असे भोंगे वाजत आहेत. भाजपने आमच्याविरोधात आतापर्यंत अनेक भोंगे वाजवले. मात्र, आम्हाला काहीही फरक पडला नाही. त्यामुळे आता नवे भोंगे समोर येत आहे. मात्र, त्यामुळेही आम्हाला काहीही फरक पडणार नाही. या नव्या भोंग्याचा भाजपलादेखील काही उपयोग होणार नाही, असे राऊत म्हणाले.
…म्हणून किरीट सोमय्यांना शिवी दिली!
मी किरीट सोमय्यांसाठी शिवराळ भाषा वापरली म्हणून माझ्यावर टीका करण्यात आली. किरीट सोमय्या हे मराठीद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणूनच मी त्यांना अशी भाषा वापरली. यासाठी उलट राज ठाकरे यांनी अभिनंदन करायला हवे होते, असा टोमणा राऊत यांनी मारला. तसेच, या भाषेसंदर्भात माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणे झाले. त्यांनीही माझ्या भाषेचे समर्थन केले. मराठी सक्तीविरोधात हाच माणुस कोर्टात गेला होता. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठी हाच माणूस डाव आखत आहे. त्यामुळे मराठी म्हणून मला वेदना होतात. त्यामुळे किरीट सोमय्या हा शिव्या देण्याच्याच लायकीचा माणूस आहे. त्यांच्याविरोधात संताप आल्याने शिवसैनिकाच्या तोंडून निघालेला हा अंगार आहे. मराठी माणूसच तो समजून घेईल, असेही राऊत म्हणाले.
राज ठाकरेंनी किरीट सोमय्यांना एखादे पदक द्यावे!
राज ठाकरे यांना किरीट सोमय्यांचे समर्थन करायचे असल्यास त्यांनी त्यांना शीवतीर्थावर बोलवावे. तुमच्यावतीने त्यांना एखादे रत्न, पदक द्या आणि ते महाराष्ट्रभर मिरवा. पण लक्षात ठेवा महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असे राऊत यांनी सुनावले. तसेच, काल राज ठाकरे यांनी किरीट सोमय्यांची बाजू घेतली त्यावरून त्यांचा भंपकपणा काल स्पष्ट झाला. राज ठाकरेंचे दैवत आता बदलले असतील. मात्र, आमचे दैवत अजूनही बाळासाहेबच आहेत. त्यामुळे आम्हाला अक्कल शिकवू नका, असे राऊत म्हणाले.
