गुगल मॅपमुळे एखादं ठिकाण शोधणं सोपं झालं आहे. त्यामुळे वेळेची बचत होते आणि चुकीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे हल्ली लोकांना पत्ता विचारण्याऐवजी गुगल मॅपवर लोकेशन सेट करून जाता येतं. त्यामुळे गुगल मॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच असतं. आता गुगल मॅप अॅपच्या माध्यमातून चालकांना आणखी एक मदत होणार आहे. गुगल मॅपवरून आता टोलची माहिती मिळणार आहे. इच्छित ठिकाणी जाण्यासाठी एकदा लोकेशन सेट केलं की, वाटेत येणारे टोल आणि त्याचं शुल्क किती आहे? याबाबत माहिती मिळणार आहे. त्याबरोबर या सुविधेद्वारे टोल मार्ग निवडायचा की टोल नसलेला मार्ग निवडायचा हे सुद्धा ठरवता येईल.
भारत, इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतील गुगल मॅप वापरणाऱ्यांना कोणत्याही प्रवासापूर्वी टोल चार्जेसची माहिती मिळेल, असे गुगलने म्हटले आहे. हे अपडेट फक्त काही वापरकर्त्यांसाठी जारी केले गेले आहे परंतु या महिन्याच्या अखेरीस सर्वांसाठी जारी केले जाईल. इतर देशांमध्ये, हे फिचर या वर्षाच्या अखेरीस येईल. नवीन अपडेटनंतर गुगल मॅप वापरकर्त्यांच्या पेमेंट मोडसह टोल आणि त्याची किंमत याबद्दल माहिती देईल. नवीन वैशिष्ट्य सुमारे २००० टोल रस्त्यांसाठी उपलब्ध आहे.