मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअरमध्ये आज गुरुवारी मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक कोसळत असताना येस बँकेच्या शेअरने तेजीची वाट धरली. सकाळच्या सत्रात येस बँकेच्या शेअरने ११ टक्क्यांची झेप घेत १६.२५ रुपयांवर गेला. या शेअरचा मागील वर्षभरातील हा उच्चांकी स्तर आहे. बँकेच्या पत मानांकनात वाढ झाल्याने शेअरला फायदा झाला असल्याचे शेअर विश्लेषकांनी म्हटले आहे.
केअर रेटिंग्ज या संस्थेने येस बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाँडचे मानांकन बीबीबी+ इतके वाढवले असून त्याबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. येस बँकेकडून ५००० कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर बाँड जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी या बाँड्सला बीबीबी असे मानांकन देण्यात आले होते. या वृत्तानंतर येस बँकेच्या शेअरची मागणी वाढल्याचे दिसून आले. आज गुरुवारी येस बँकेच्या शेअरमध्ये ११ टक्के वाढ झाली. तो १६.२५ रुपयांवर गेला. बुधवार तो १४.६९ रुपयांवर स्थिरावला होता. येस बँकेचा शेअर सध्या ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीवर आहे.
३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत बँकेच्या कामगिरीत चांगली सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बँकेच्या कर्ज वितरणात ८.८ टक्के वाढ झाली असून १८१५०८ कोटींपर्यंत आकडा वाढला. विश्लेषकांच्या मते नजीकच्या काळात येस बँकेचा शेअर २० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. १३ रुपयांवर गुंतवणूकदारांनी स्टाॅपलाॅस ठेवावा, असा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.
आठवडाभरात तब्बल ३३ टक्क्यांनी वाढला
विशेष म्हणजे नवं आर्थिक वर्ष सुरु होताच येस बँकेच्या शेअरचे नशीब बदललं आहे. एप्रिल महिन्यात येस बँकेचा शेअर तब्बल ३३ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेची दमदार कामगिरी आणि ५००० कोटींचा बाँड इश्यू यामुळे गुंतवणूकदार बँकेच्या कामगिरीबाबत आशावादी आहेत.